सख्या वनमाळी ! पहा तरी काही ! !

( चाल : आज दिवाळी . . ) 
सख्या वनमाळी ! पहा तरी काही ! ! 
कटावरी कर ऐसा धरुनी का राही ? llधृ।। 
किती युगे गेली मागे , संत सांगताती । 
झाला नाही का विचार आपुलिया चित्ती ? 
अशांतले जग काही नुरलीसे आशा । 
चहू बाजुनिया सगळा जाहला तमाशा ! 
बोलरे ! बोलना ! ! तुज भान नसे काही ॥१॥ 
चोरी जारी दिवसा ढवळ्या करीती जे जन । 
तरी त्यांचा लोकामाजी वाढतसे मान । 
हरीनाम गाती नित्य त्यांना नाही अन्न । 
सत्याने वागती त्यांचा नाही मान - पान । 
कोणरे , कोणरे त्याची देई ग्वाही ! ! ॥२॥ 
तुझ्यासाठी करिती त्याग , वाली तू म्हणोनी । 
रात्रंदिन तुझिया चरणी प्राण सांडवोनी । 
कोणा नको त्रास म्हणोनि नम्रता धरोनी । 
तुकड्यादास म्हणे त्यांची ऐकिना कहाणी ! 
तोलरे , तोलना    ब्रिदासाठी    येई ! ॥३॥ 
                                 - लोणावळे , दि . २२ - ०७ - १९५९