वाहवारे गणराज ! शोभली भक्ति - पुजाही आज

( चालः सरपे टोपी लाल , हाथ में . . . ) 
वाहवारे गणराज ! शोभली भक्ति - पुजाही आज , 
भला उल्हास दिसे । ।
बालमनाचे ध्यान , करितसे तुजसाठी तूफान , 
भला उल्हास दिसे ॥ धृ० ॥ 
मोदकाचे गंज ताटी , पुष्प चंदनाची दाटी , 
लाल गुलालाच्या वाटी । 
रत्नजडित हार कंठी , कुंडलाची प्रभा मोठी , 
पितांबर रेशम - काठी । 
नव - तरूणाचे प्राण , सदा तव भवति करी गुणगान , 
भला उल्हास दिसे ॥ १ ॥ 
लखलखाट भोवताली , धूप दिपांच्या मशाली , 
जणू दिवाळीच आली । 
आम्र - तोरणाच्या वेली , महाद्वारे फुलली - सजली , 
अपूर्व ही शोभा आली । 
वाद्ये वाजती छान , चालती नृत्य आणि गुणगान , 
भला उल्हास  दिसे ॥ २ ॥
तोल सावरेना कोणी , कुणी कुणाचे ना मानी , 
वेडावले भावनानी । । 
मुला - मुलींची मनमानी , रासलीला दिसते नयनी , 
कुणी ऐकिना गाऱ्हाणी । 
पाहतो तुकड्यादास किती हा धन - द्रव्याचा नाश , 
भला उल्हास दिसे ॥ ३ ॥ 
              - प्रवास ब्रह्मपुरी ते नागपूर , दि . १६ - ०५ - १९५८