सरले सगळे वय आता , जीवनाची तुटली गाथा
( चालः बनबनकी बनवासी रे . . . )
सरले सगळे वय आता , जीवनाची तुटली गाथा ।
वाटे थोडे दिवस जीवाचे ! ॥ धृ० ॥
बाळपणीचा आठव होतो , खोडसाळ ते वय गेले !
उत्तम - वाईट सगळे घडले , मन हे शरमिन्दे झाले !
तारुण्याचे पाप भयंकर , वदवेना काही वाचे ! ॥ १ ॥
हरिनामाचा आळस होता , तोंड फुटेना भजनाला ।
नाच - तमाशा येता गावी , वाटे तो अमृत प्याला ! !
ऐशा अधमा मुक्ति कशाची ? व्यसनासाठी मन नाचे ॥ २ ॥
आठवते ते सगळे जेव्हा , जीव घाबरा हा होतो ।
कोणा जाऊ शरण अता मी ? कोण असा तो उध्दारतो ?
तुकड्यादास म्हणे , गुरुदेवा ! दे तोडुनिया यम - फासे ! ॥ ३ ॥
- घुडनखापा , दि . २९ - ०९ - १९५९