हरि ! हरि ! ! बोलत का बसला ?

( चाल : बनबनकी बनवासी रे . . . ) 
हरि ! हरि ! !  बोलत का बसला ? , काम करायासी रुसला । भोजन देइल कोण तुला ? ll धृ० ॥ 
आज जमाना नाही तसला , कष्टावाचुनी मान करी । 
कोणि पुसेना रिकामटवळ्या उभा जरी तू परद्वारी । । 
हे सांगणे नकोच आता , रुसला  किंवा  तू   हसला ! ॥ १ ॥ 
एके काळी जनसंख्येला , कृषी - धान्य होती पुरती । 
लाखोंनी वाढती मुले ही , कितीतरी नाती - पोती । । 
श्रमजीवी तर अतीच कमती , बेकारीचा गळ  बसला ॥ २ ॥ 
ऐकारे बाप हो ! दोन्हिही साधा , तर उध्दार असे । 
काम करा अन् हरि स्मरा , तर मग कोणी बोले कैसे । । 
तुकड्यादास म्हणे सांभाळा , वेळ बघोनी हा असला ॥ ३ ॥ 
                 - घुडनखापा , दि . २९ - ०९ - १९५९