तुझ्यात आहे उदय प्रगतिचा

( चाल : छंद ) 
तुझ्यात आहे उदय प्रगतिचा , तुझ्यातची लय होत असे । 
मग मी हीन-दीन म्हणुनि कशाला । 
नवल दाविसी जगा  असे ?।।धृ।। 
तूच ? भिन्नदेशात भरारी , चंद्राच्याही वरी करी । 
तुझ्यातची ती शक्ति विलसते , जगताचा संहार करी । 
तूच बंधुता वाढवूनिया , लाखोनी भूदान करी । 
स्वतंत्रतेला तुझेच कारण , नाही का ? - हे सांग तरी । 
तूच जगावर संत म्हणोनी , मानवतेनी प्रेम करी । 
तूच अहिंसा - सत्य  मिरवुनी , शांतीचे सुस्वास भरी । 
तूच नाही का हिमालयावर , कठिण तपस्या करीतसे । 
मग मी हीन - दीन म्हणूनि , कशाला ।
नवल दाविसी जगा असे ? ॥१॥ 
ओळखूनी ही जात आपली , जागृतपण घेईना मनी । 
विश्वचि माझे का मग म्हणशी ? बोल जरा तरी मनातुनी । 
उगीच अपुल्या उन्नतिचाही मार्ग घेशि का थांबवूनी । 
कोण तुला अडवितो ? - सांग तरि , सरळ जावया पुढेजनी । तुझीच लीला खेळ दाविते , तूच भ्रमसी त्यांना बघुनी । 
म्हणुनिच म्हणती साप भासतो , रज्जूवरी आरोपवुनी । 
तुकड्यादास म्हणे सत्संगति , करुनी पहातरी नाही कसे । 
मग मी हीन-दीन म्हणूनि , कशाला । 
नवल दाविसी जगा   असे ।।२।। 
                - सेवाग्राम - वर्धा , दि . १८ - ०३ - १९५९