संतती नच ही तुझी , हा देश - उन्नत दीप आहे
( चालः आकळावा प्रेमभावे . . . )
संतती नच ही तुझी , हा देश - उन्नत दीप आहे ।
भावनेनी यास शिकवी , जो सदा सुखरुप राहे ॥ धृ० ॥
शिकवी विद्या गुण तयासी , हा सदा उद्योगी हो ।
आरोग्य सुंदर हो तया , ह्या दृष्टीने तू त्यासि पाहे ॥ १ ॥
शक्ति नष्ट न हो तुझी , अणि धर्मपत्नीची तुझ्या ।
योग्य रक्षण होई ऐसे , समजुनी भोगासि पाहे ।। २ ।।
ना तरी श्वानापरी , बहु पुत्र होवूनि काय साधे ।
रोग - पीडित बुध्दिहिन जे , आळसी आज्ञा न साहे ॥ ३ ॥
खावयासी अन्न नाही , वस्त्र नाही ना घरे ।
कासयासी हा पसारा , समजुनी तरी सांगना हे ॥ ४ ॥
संयमी राहणी करी , अणि थोडकेची पुत्र हो ।
शूर हो अणि धीर हो , आजन्म ज्यांची कीर्ति राहे ॥ ५ ॥
दास तुकड्या सांगतो , हा देश तुजवर शोभतो ।
म्हणुनि करी सुंदर गृहा , सौजन्य तेथे नांदता हे ॥ ६ ॥
- गुरुकुंजाश्रम , दि . ०१ - १० - १९५९