श्रीगुरुच्या हो ! कृपेने सांगतो
( चाल : क्यों नही देते हो दर्शन .. )
श्रीगुरुच्या हो ! कृपेने सांगतो ब्रह्मांड - रचना ॥ धृ॥
नव्हती पृथ्वी आप - अनळ I वायुही आकाश सकळ I
होते बीज ब्रह्म निर्मळ | पाहि शोधुनि आत्मज्ञाना ॥१॥
सप्तपाताळ ते नव्हते । स्वर्ग एकवीस भुवनही ते ।
ओह शब्दचि विसर्ग तेथे । मूळ माया डाली जाणा ॥२॥
पुरुष -प्रकृति ऐक्य झाले । त्रिगुण तेव्हा ते उपजले ।
रज-तम-सत्व नामे वहिले । ज्ञातिपुरुषा ! आण ध्याना ॥३॥
मूळमाया अति विशाळा । भाली डोळा तये वेळा ।
उधडिता ब्रह्मांडगोळा । भस्म करि की काय कळेना ॥४॥
बोले माया क्रोधे करुन । संग द्या रे ! त्वरित पूर्ण ।
न देती ते सत्त्व-रज-गुण । भस्म केले त्या द्वयांना ।।५ ।।
तम वदे तो देतो भोग । नेत्र मागे तिसरा मग ।
नेत्र देता केला त्याग । आलि माया त्रिविधमाना ॥६॥
गुरु तो हंसरुपी केला । पुढे आरंभ पृथ्वीला ।
वेद ध्वज उभारीला । व्यवहार - स्थापना ।।७॥
रज तो ब्रह्मा सत्त्व विष्णू । तम तो रुद्र काय वर्णूं ?
तुकड्या म्हणे गुरुदेव पूर्ण । आडकोजी पाजि पान्हा ॥८॥