घटी राहोनिया ईश्वर कशाला पळतो रानी रे !

( चाल : अगर है शौक मिलनेका .. )
घटी राहोनिया ईश्वर कशाला पळतो रानी रे !
पळूनिया रानोरानीही   चुकेना   जन्मखाणि    रे ! ॥ धृ 0॥
वसे नाभीस्थळी विष्णु पुसा सद्गुरुसि जावोनी I
कसे त्याला बघावे हे का भरता   बहूत    पाणी     रे ! ॥१॥
राहती संत बहू जगती कितीका याचि ना गणती ।
ते त्वंपद-तत्पदा बघती  विचारी   तूहि    आणी    रे  ! ॥२॥
कसा आला ? कुठे जातो ? काय करितो ? कुठे राहतो ?
करी न विचार   याचाही    मरे    मायीच    प्राणी    रे ।।३ ॥
ब्रह्मरंध्रात कोण वसे पाठ करिती अनायासे ।
अनुभव नेणता  कैसा   करी    उपदेश   कोणी     रे ? ॥४॥
खरे शोभा खरे शोधा भटकता का प्रपंचात ?
तो तुकड्यादास लिन झाला गुरुच्या खास चरणी रे ! ।।५ ॥