लक्ष ठेवुनी अलक्ष्य बघसी जाशिल

(चालः पतीत पावन नाम ऐकुनी..)
लक्ष ठेवुनी अलक्ष्य बघसी जाशिल निज-भुवना ।
ज्या नामे फिरति सात रत्ने ते आणी ध्याना ॥ धृ०॥
कवणे ठायी राहति जिव-शिव त्वरित पाहि प्राण्या !
वय गेल्या मग काहि न चाल उपाय करि शहाण्या ॥१॥
घटी निरंजनमाळ चालते का नच पाहि तिला ?
विषय सेवुनी लुब्ध प्रपंची चौऱ्यांशित पडला ॥२॥
कशि होइल मग सुटका आता ? सद्गुरुला ध्याई ।
गुरुकृपेने मार्ग पाहूनि निज - भुवना जाई ॥३॥
केसा तरला वाल्या कोळी भक्ति-शक्ति ऐसी ।
तत्क्षणी धृव तो स्वर्गी गेला, तू का निजलासी ? ।४ ।।
सोपे सोडूनि गहन धरीसी व्यर्थ फजित व्हाया।
सहजचि तारी तुकड्यादासा आडकुजी   राया ॥ ५॥