श्रीसमर्थ आडकुजी बोले तुकड्याला गुज ऐके रे !

(चालः उठा गड्या ! अरुणोदय..)
श्रीसमर्थ आडकुजी बोले तुकड्याला गुज ऐके रे !
सर्वहि दोष जळुनिया बापा ! चुकतिल चौऱ्यांशी फेरे ॥ धृ०॥
पाहुनिया एकांतस्थाना तेथे जाउनि बैसे रे !
मांडुनिया पद्मासन चंचल मन हे स्थिरवी तैसे रे ! ।।
वृत्ति आवळुनि सगळी तेथे द्वैत भावना सोडी रे !
करुनि अंतरी प्रवेश सखया  ! नाभिस्थानी पाही रे ।।
गंगा - यमुना-सरस्वतीचा संगम जेथे होई रे ।
दोन अक्षरांचा जप करुनी रत्ने सातहि पाही रे ! ॥
एक सहस्रदळा माझारी मसूर डोळा भेटे रे !
त्या डोळ्याच्या मधे निळा चकचकित रंग तो साजे रे !
म्हणुनी त्याला अलक्ष मुद्रा अठ्ठाविस ते शिणले रे !
सहस्रमुख तो थकला बापा  !  सद्गुरु तेथे दिसले रे ! ।।
ऐसा जो बा  ! करिल योग तो चौऱ्यांशिला मुकला रे !
तुकड्यादास म्हणे सर्वस्वे शरणागत सदगुरुला रे ! ।।