अरत्री परत्री । ना होईल गुरुविण खात्री
(चाल: सगुण गुण माया आली कोल्हटीण..)
अरत्री परत्री । ना होईल गुरुविण खात्री ॥धृ०॥
करुनी औट हात पिंजरा । मध्ये राघूबापू बरा I
एकविस सहस्त्र करि येरझारा । अजि ! अहोरात्री ॥
ना होईल गुरुविण खात्री ॥१॥
शिव-शक्ति ही दोन पाखरे । एक हिरण्यगर्भी थारे !
एक आकाशी गमन करे । मधे त्रिविध कात्री ॥
ना होईल गुरुविण खात्री ॥२॥
तेथे अनमोल सात रत्न । पाहता ना राहे देह-भान ।
मी कोठिल कोण पूर्ण ? स्वयंभू हा तरी ॥
ना होईल गुरुविण खात्री ॥३॥
चंद्रसूर्य दीपक त्याला । गंगा - यमुना झरा लाविला ।
त्रिवेणीमध्ये संयम केला । सत्राविचे वरि चढविला ।।
जिथे अर्धमात्री ॥ ना होईल ॥४॥
शंख मृदंग घंटा वाजे । तेथे भ्रमर गुंफा साजे ।
तया गुंफेस नउ दरवाजे । चालली होरी ।।
ना होईल गुरुविण खात्री ॥५॥
तुकड्या म्हणे तरेल प्राणी । जो शरण सद्गुरुचरणी ।
विश्वासे लावि मन झणी । अमृत - झिरी ।।
ना होईल गुरुविण खात्री ॥६॥