अंबिके ! तारक सकलांची

(चालः आरती जय जगदीश्वर की.. )
अंबिके ! तारक सकलांची । आदिजननी तू जगताची ॥धृ०॥
शक्ति तू मूळ अनादीची । स्फूर्ति तू निज चैतन्याची ॥
रुपसुंदर लावण्याची । चित्कळा चराचरी साची ।।
स्थान तव रम्य अती शोभे ।
अमरपदि प्रशांत सुख लाभे ।
मन हे मोहुनि पदि      झोंबे ।
तुझा दरबार सुखाचा सार म्हणो अवतार
खचित तू स्फूर्तिदायि अमुची ।गमसि मूळ वाचा वैखरिची॥१॥
कितिक सांगती तुझी ख्याती । नाहि त्या साक्षीची गणती।।
पावसी तू पुढता पुढती । कुलस्वामिनी तुला म्हणती ।।
नवविधा भक्ती नवरात्री । आदरे यथामती पुजती ॥
कुठे तू महिषासूर-मथनी ।
कुठे तू योगेश्वरि म्हणुनी ।
इथे तू एकविरा जननी ।
भक्त सुखदायि वत्सले आई  !  नमू तव पायि
होई रथ-वाहक तुकड्याची । भक्ति मज दे  श्रीसदगुरुची ॥२॥