विराटपुरुषा ! तुझे स्वरुप हे , पाहण्यासाठी
(चाल : हटातटाने पटा रंगवुनि...)
विराटपुरुषा ! तुझे स्वरुप हे , पाहण्यासाठी अम्ही I
जाहलो जिव धैर्याने कमी ॥धृo।।
उग्र रुपाचा जबडा असला कधीच ना पाहिला I
जवळ जो हृदयाशी पातला ।।
महाकाळ विक्राळ मुखाडे पसरी भूमीवरी I
करोड़ो लाखो जिव संहरी ।।
( अंतरा) भारती ऐकिला असेल कोणीतरी ।
परि आज दिसे जो बघता जिव घाबरी I
हा देव असे की असेल काळापरी ?
घाबरले जनलोक पाहूनी शहाणे झाले भ्रमी I
सुचेना उदासले आश्रमी ॥१॥
अनन्तमुख ! हे अनन्तबाहो ! अनन्त शस्त्रे तुझी I
पाहण्या नेत्र पुरति ना अजी ॥
खळबळल्या सागरापरी तव उठती लाटा किती !
ऐकता गुंग होतसे मती ॥
नदी - पर्वतासमान ज्यांची विशाल सेना - दले ।
कड़ाडे गर्जे उग्रावले ॥
( अंतरा ) चेतले दिशांनी दाही सामरांगम ।
हे पाताळी आकाशी संक्रमण I
अस्मानी - सुलतानिचे नांव घेऊन।
वणव्यामाजी जीव मरे त्यापरीच सनदे श्रमी ।
कळेना किती हे होतील कमी ॥२॥
अन्न स्वहा माणूस स्वहा जड़ वस्तु साऱ्या स्वहा।
स्वहाचे यन्त्र सर्वदा स्वहा ॥
महाप्रबल हे निसर्ग अपुले रूप दाखवी महा I
पेट घे सकळ जिवाचा दहा ।।
सूर्यरश्मिवरी लपति काजवे तसेच हाल महा।
कुणी ना पुढे हात घेत हा ।।
( अंतरा ) लावूनी कुणाला नाश कुणाचा करी।
हे तुच जाणशी विराटपुरुषा ! हरी ।
नच कळे तुझ्याविण कोणा जगले तरी ।
रक्षण करुनी बाग आपुला शांतवावया मनी ।
न पार्थासमान दिसतो कुणी ॥३॥
संघर्षातुनि न्याय देई तु साक्षी भू - देवते ।
जयाचे हक्क तया देई ते ।।
पुन्हा न येवो वेळ अशी ही करुनी दे सोय ते।
करी काय जे अता होय ते ।।
जगच्चालका ! अखिल - पालका ! कळते तुजलाचि ते ।
कुणाला मारुनि सुख काय ते ?
( अंतरा ) घे स्वरूप मानसापरी सत्य समजुनी ।
प्रगटवी आपुला ज्ञानांकुर गर्जुनी ।
मानव्य सुखाची वाट दाखवी झणी ।
तुकडयादास म्हणे जगदीशा ! दुःखि न ठेवा कुणी |
फळे द्या सत्य बघोनि मनी ॥४॥