तुज पाहति गडया ! गोकुळीच्या श्रीकृष्णा ?
( चाल : मनि धीर धरी शोक आवरी ... )
तुज पाहति गडया ! गोकुळीच्या श्रीकृष्णा ?
लागली भूक बहू नयना ॥ धृ०॥
ही पुष्पलता झुरूनी पंजर झाली
न कळे ही का पिवळटली I
अति तप्त जशी भूमि फुटोनी गेली
जाग जागी खळगी बनली I
नदि - विहिरीची प्रेम - पाझरे विरली
खडकाळे उघडी पडली I
(अंतरा) अति उग्र भानुच्या ज्वाला ।
ना सहन होती जनतेला ।
उष्ण वायु उडवी धुरळा ।
ओसाड दिसे गांव वने ही सगुणा ।
तुज नये काय तरि करुणा ? ॥१॥
श्रीमंत - धनी लोभास्तव हावरले ।
तृष्णेने या घाबरले ।
कुणि घाबरले कुणी फिराया गेले
कुणि घरीच द्डुनि बसले ।
त्यामुळे गड्या ! गरिब उपाशी पडले
धान्याविण अति तडफडले I
(अंतरा) बहु भाव पिके अति थोडी ।
गरिबास पुरेना कवडी ।
कोणि ना सदयता जोडी ।
किती त्यजति रे अन्नाविण या प्राणा
नच दया सुखी लोकांना ॥२॥
ज्या कष्टविती त्यांचे रक्तचि पिती
मोबदला पूर्ण न देती ।
या सर्व जगी अशीच दिसते रीती
नच कळे कशी ही नीती ।
जे कमवुनिया दुजास सौख्यहि देती
जगती या त्यांची फजीती ।
(अंतरा) ही परम्परा या लोकी I
नच पूर्वीपासूनि होती I
या साक्ष पुराणे देती ।
परि दोष असा अजि तो न कळे कोणा
का भाग्य-उदय होईना ? ॥३॥
तू कोठवरी पाहासि असली दैना ?
नच आम्हा बघवे कोणा ।
ती याद तुझी येते हृदया सगुणा ।
गरिबांची तुज बहु करुणा ।
विश्वास असा धरुनी बसलो प्राणा
श्रीकृष्ण ब्रीद सोडीना !
(अंतरा) जनता ही जर्जर झाली !
अंधारी सृष्टि काळखली I
नच प्रकाश - किरणे पडली I
तुकडयास गमे येईल प्रभूला पान्हा
परि आस जिवा जगवेना ॥४॥