जागृत व्हाना देविदेवता ! करा काही कल्याण अता

(चाल : असार जीवित केवळ माया..)
जागृत व्हाना देविदेवता  ! करा काही कल्याण अता ।
माणुसकी ही गेली जगाची आणिक गेली बुध्दीमता ॥घृ0॥
धर्मकर्म कवणास म्हणावे समज उमज कोणा नुरला ।
पाप करोनी मजा करा हा अंध-भाव तरुणा स्फुरला ॥१॥
पोटासाठी गुलाम सगळे जे सांगा ते करु म्हणती ।
विरळे कोणी मायभूमिची पर्वा  सारे   धरू   म्हणती ॥२॥
पर-उपकार कशाला म्हणति कठिण मार्ग झाला आता ।
शेजारी जरि अन्नावाचुनि मेला तरि  कवणा  चिंता ? ॥३॥
हाल असा कुठवरी जगाचा पाहशिल सखया भगवंता ।
गेले ते जाउ दे दिवस पण पुढे नको  आणुस   आता ॥४॥
सर्व जिवांना दे सद्बुध्दी माणुसकीची कर्म कथा ।
तुकड्यादास म्हणे सर्वाना जाऊ   दे   कर्तव्य - पथा ॥५॥