आहे तसाच येशील का धाव घेउनी

(चाल : अब तेरेसिवा कौन..)
आहे तसाच येशील का धाव घेउनी ।
करशील कार्य एवढे न मोह ठेवुनी ? ॥धृ०॥
मधुबंसि टाकुनी कुठे तू चक्र घे करी ।
अणि देवपणा सोडूनी तू करिशि चाकरी ।
ही ऐकशिल हाक    काय   लक्ष   देऊनी ? करशील0 ॥१॥
म्हणतात लोक हे तुला तू कोठला हरी ? ।
असतास तरी दैन्यदुःख घोर का करी ? ।
सगळेच सुखी देश नि गुलाम का आम्ही ? करशील 0 ॥२॥
वद कठीण काय हे तुला तू तेचि ना करी ।
जगी आजवरी हेचि तुझे कार्य श्रीहरी ? ।
मग घे मुकुट घाल चाल मस्त  हो   मनी । करशील 0 ॥३॥
म्हणशील भक्त नाही कुणि हाक मारतो ।
कोणी न पुजा सारती न करती आरती ।
हे विसर अता भक्ती तुझी कोठली जनी ? करशील0 ॥४॥
नच भक्तिचा तू मोह धरी आपुल्या मना ।
वेळेची - अवेळेची सोड सोड कल्पना ।
तुकड्या म्हणे तसाच धाव  धाव  चींतन । करशील0 ॥५॥