दिसला ज्वाळ मला ये रे येना सखया !
(चाल : दुडु दुडु धावत ये...)
दिसला ज्वाळ मला ये रे येना सखया !
लपुनि रहाया सत्य वदाया ॥धृo॥
वाजत बघ कैसे भं - भं भूमंडळ हे ।
दिसती धूर कसे करिताती खळबळ हे ॥
न्यायी-अन्यायी सर्वचि पडतिल भू या ।
जाऊ नको या - वेळी पहाया ।।१।।
लाटा वरि चढती मेघांच्या या काळ्या ।
कडकड वाजति ह्या विजा चमकती सगळ्या ॥
स्वस्थचि बस बाळा ! ये प्रभुला सांगाया ।
आवरि माया रे यदुराया ! ।।२।।
प्रभु हा का ऐसा टाकुनि आम्हा गेला ?
त्याचा काय असा रोष अम्हावर झाला ?
वाहत गाव कसे मरती आयाबाया ।
कोण जिवा या सांभाळाया ? ॥३॥
या भयभयीत जगी कोणा सूख पुसावे ।
कोणिकडे जावे ? आश्रय कोठे घ्यावे ? ।
तुकड्यादास म्हणे तूचि सखा प्रभुराया !
तार मुलां या या भारतीया ॥४॥