अंधारी जाऊ नका कोणी

( चाल :  परधानि गेला दर्या  पार .. )
अंधारी जाऊ नका कोणी ॥ धृ०॥
भरली गंगा खळखळ वाहे ।
त्यामधी जीव क्रुर आति आहे I
ओढूनी      नेई     पाणि I अंधारी जाऊ 0॥१॥
अंधाऱ्या ह्या रात्री कशाला ।
घेऊनि आशा मार्गि निघाला ? ।
राहति    चोर    टपोनी ।। अंधारी जाऊ 0॥२॥
वनि गर्जत वटवाघुळ फिरती ।
व्याघ्र भयंकर गुरगुर करती ।
हरतिल   प्राण   तुटोनी ।। अंधारी जाऊ 0॥३॥
अति सळसळती साप विषारे । 
 काम-क्रोध-मद नांव तया रे ।
नेतिल    शांति   लुटोनी ।। अंधारी जाऊ 0॥४॥
तुकड्यादास म्हणे घ्या हाती ।
ज्ञानप्रकाश चढा मग वरती ।
करा भजन मनि ध्यानि ।। अंधारी जाऊ 0।।५॥