लोपला का प्रेम भावे !

(चाल: सावळ्या ये निर्मला रे..)
लोपला का प्रेम भावे ! राहशी    दुरच्या   दुरी ।
वेळ का उरली अता ? मम शून्य झाली  वैखरी ।।धृ०।।
नेत्र टवते जाहले, कफ - मेरु हृदयी पातले ।
रोग शरिरी ये  भले,   मज    झोप   लागेना   पुरी ।।१।l
श्वास ऊर्ध्वचि लागला, हा देह धरणी भागला ।
शिर शिखर तो बाग़ला,अजि कंठ आला खरखरी ।।२॥
वासना उरली अशी, नेई तुझ्या पायी मशी ।
करविशी का गे ! हसी ? तरि धीर मी हृदयी  धरी ।।३॥
हाक घे ऐकोनिया, मग जाइ मज भेटोनिया।
दास तुकड्याची  दया  घे,   आस   नुरली   दूसरी ॥४॥