सुखाचा मार्ग जगाला पावो
(चाल: पुजारी मोरे मंदिरमो..)
सुखाचा मार्ग जगाला पावो, निर्मळ ज्ञान प्रवाहो ॥धृ0।l
दूर पळो ही नीच दुराशा, राहो मन संतुष्ट हमेशा ।
द्रोह लयाला जावो ।। सुखाचा 0 ।|१।।
सेवाधर्म जिवाचा वाढो, अविचल प्रेम न भू-चे खंडो ।
ऐक्यपणे प्रभु गावो ।। सुखाचा 0 ।।२l।
दुष्टपणाला रीघ न लाभो,खळ वधण्यासी तिळ न विलंबो ।
निर्भय तेज समावो ।। सुखाचा0 ।।३।।
भारति पार्थासम वीर व्हावे, पार्थचि पार्थ जगात दिसावे
दुर्बलता दुर जावो ।। सुखाचा 0।।४।।
इहपर-सौख्ये नांदो जगती, चालो पुरुष विवेके स्वगती ।
भीति समूळचि जावो ।। सुखाचा 0।|५l।
तुकड्यादास म्हणे गुरुदेवा ! भक्ति रमो अमुच्या जीवभावा ।
वीर सदा विजयी हो ।। सुखाचा0।।६।।