चल ऊठ सेवका ! ऊठ उभा हो धीट

(चालः शिवराया जाई तो रणा..)
चल ऊठ सेवका  ! ऊठ उभा हो धीट झाली पहाट
                      निशा ही गेली ।
तुज कार्य कराया उषा दिशेवर आली ॥धृ०॥
ही पहा दिशांना दाही विकसली फुले उत्साही ।
पशुपक्षि जीव जनताही लागली कार्य करण्याही ।
त्या जरा न चिंता काही अति हर्ष-हर्ष सुखदायी ।
तू कसा झोपला असा ? जाहला पिसा उदासी आली ।
                 म्हणुनीच मातृभूमिची अवनती झाली ॥१॥
या सकल जिवाहुनि शहाणा मानवा तुझारे बाणा ।
जाणशी ज्ञान- अज्ञाना अपकीर्ति कीर्ति सकळांना ।
करिताचि प्रयत्ने नाना तू जाणशि त्या भगवाना ।
निर्मुनी प्रभुने तुला सोडला खुला आयु नच घाली ।
          गमविता संधि ही गड्या ! पुन्हा नच खाली ॥२॥
चमक रे चमक भूवरती घे करुन जिवाची कीर्ति ।
शरण प्रभुरायासी हा देह अर्पनी त्यासी ।
साधण्या जिवाची सेवा घे वर ची मागुणी देवा ।
सद्गुणा धरुनिया मना करी प्रार्थना स्मरुनी वनमाली ।
                  मग पहा भारती सदा दिवाळी आली ॥३॥
आवरी मोह विषयांचा करि त्याग लोभ- ममतेचा ।
धरि संग सदा सुजनांचा व्हावया उदय वैभवाचा ।
हा बोल ऐक प्रेमाचा क्षण पळहि असे कामाचा I
चल सोड बिछाना सोड वृत्तीला मोड राष्ट्र सांभाळी I
                   हो प्रयत्नवादी भाग्यवान सुखशाली ॥४॥
हा निसर्ग तुझिया घरचा तू प्रेमपुजारी याचा I
देव हा भक्ति भावाचा हा अनुभव अनुभवियाचा I
मग प्रसंग तुजला कैचा येईल सांग दुःखाचा I
धीर रंग होई निःसंग फेडि हा पांग देश - कंगाली I
               तुकडयाची ऐक रे हाक वेळ बहु झाली ॥५॥