जो निघतो दिवस दुःखाचा काय करावे आता ?
( चाल : धन्य धन्य गे स्फूर्ति .. )
जो निघतो दिवस दुःखाचा काय करावे आता ?
रोग हा नावरतो सर्वथा ॥ धृ 0॥
महाप्रबळ हे चक्र चालले शिरले शरिरांतरी I
अजुनिही कळे न कोणा परि I
क्षयरोग्यासम तोंड जाहले शरीर गळले पुरे I
कळेना जीव कधी जाई रे ॥
( अंतरा ) जो येतो तो दावितो अपुल्या परी I
रोगास पाहुनी म्हणतो मी घे करी I
परि कळे न नाडी काय उक्ति ती खरी ।
कोण भूत लागले जयाने दृढ केली ही सत्ता ।
निघेना रोग - भोग हाकता ? ॥१॥
लवकर साधा करा योजना या रे सगळे जमा ।
प्रार्थना करु त्या पुरुषोत्तमा ॥
सर्व जमोनी मंथन करु या काढू अमृत सुखा ।
रोग हा होय जये पारखा ।
अपुले अपुले सोडुनि सारे सर्व आमुचे म्हणा ।
करु या सत्याची गर्जना ॥
(अंतरा)या मरु जगू जे होइन ते पाहु या ।
या करु कार्य समुदायाने गाउ या ।
या स्मरु आपुल्या पूर्वजांसि जाउया ।
जे होइल ते होवो परि हा रोग न राहो अता ।
मारिली याने बुध्दिमता ॥२॥
काय म्हणावे कुणा ? आमुची चूक मुळी जाहली ।
सुखास्तव सोय जवळ पाहिली ।
बरी वाटली परंतु घुसली निघे न आता खुली ।
रुढि ही उरीच बोकाळली ॥
आपत्तीविण कुणा कळेना तशीच गति लाभली ।
अनुभवा आधि शिकवू लागली ॥
( अंतरा )या होउनिया सावधान सगळे गडी।
रोगास काढु घेउनी प्रार्थना-जडी ।
काय देव सांगिल तशी मारुनी उडी ।
तुकड्यादासा गर्म व्यर्थ हे जीवन अपुले अता ।
मरु तरि पुर्वजाचिया मता ॥३॥