चला चला रे । करु प्रार्थना

(चाल : असार जिवीत केवळ माया..)
चला चला रे । करु प्रार्थना जमवुनिया साथी अपूले ।
जागृत करु पूर्वीचे वैभव आळस करिता जे   गेले ॥धृ0॥
स्वच्छ बिछायत टाकुनि वरती बसू करुनी रांगा सगळे ।टापटीप आणि सुंदर वस्त्रे घेऊनिया  येऊ   उजळे ॥१॥
एकमताने करु प्रार्थना सेवक जशि देतिल सुचना ।
नम्र होउनी रमु त्या स्थानी बोध तसा घेऊनी  मना ॥२॥
अति शांतसी घडी तेथची पाहुनि गंभिरता थाटे ।
गाहिवरते मन बोध ऐकता जन्म सफल होतो वाटे ॥३॥
प्रशांत जळतो नील दीप तो सुगंध देतो हार तसा ।
वाटे श्रीगुरुदेव प्रगटले  होतो   जन - उध्दार   तसा ॥४॥
धर्म - वर्म सगळेही कळते जाता नित्य नवे तेथे ।
तुकडया म्हणे जळूनिया पापे देवत्वचि अंगी   येते ॥५॥