व्हा उभे धर्म- रक्षणा, धैर्य हे का सोडता ?

(चालः यमुना जळिं खेळू खेळ..)
व्हा उभे धर्म- रक्षणा, धैर्य हे का सोडता ? ।
गर्जु द्या वीर-गर्जना, मार्ग हा का मोडता ? ।।धृ०।।
(अंतरा) चमकु द्या रक्त वीरांचे ।
उघडु द्या कर्ण शूरांचे ।
फोडु द्या भंड  क्रूरांचे ।
द्या प्राण रणी खोवूनी, हात  हे   का   जोडता ? ।।१॥
(अंतरा) श्रीकृष्ण आमुचा ईश ।
सांगतो  हाचि   संदेश ।
ठाऊके  आर्य -पुत्रास ।
लागेल पाप न ऐकता, वचन हे   का   खोडता ? ।।२।l
(अंतरा) गाईचे वाचवा प्राण ।
अबलासी द्या जिवदान ।
राखा वडिलांचा   मान ।
चला उठा, उठा तरुणहो ! वेळ ही का दवडिता ? ॥३॥
(अंतरा) आळवा प्रभूसी ध्यानी ।
मागा यश  या   संग्रामी ।
घ्या उड़ी उधळवा ऊर्मी ।
तुकड्याचि आस ही पुरी, होउ द्या  का   तोडता ? ॥४॥