हरिकथा ऐक गड्या ! कानी
(चाल : सुजन हो ! परिसा रामकथा..)
हरिकथा ऐक गड्या ! कानी
उभा हो चल ये मैदानी ॥धृ०॥
चल सोड घराची आस बनु नको दास मनी विषयाचा ।
घे प्रेम-कमंडलु चिमटा वैराग्याचा ॥१॥
होउनी प्रचारक गुणी फिरुनिया झणी हरि-जनासाठी ।
ही सर्व सुखाने भरुन उरु दे सृष्टि ॥२॥
हरि तुझ्या जवळ इच्छितो काय तू भितो मान अपमाना ? ।
हो निर्भय अपुला उज्जवल ठेवुनी बाणा ॥३॥
जे आजवरीचे दास लावुनी आस फास जीवाला ।
फिरतात निर्जनी वनी शोध घेण्याला ॥४॥
उगा मंदिरात बसु नको असा शिकु नको आळशी व्हाया ।
करि हरि-कीर्तन रे ! लाग हरिच्या कार्या ॥५॥
हे विश्व हरीचे दिसे कथेस्तव नसे असे कर्माचे ।
तुकड्याची ऐकुनि हाक गूज शिक त्याचे ॥६॥