सोडू नका भावना त्यजू नका कामना

(चालः घटा घनमोर घोर..)
सोडू नका भावना त्यजू नका कामना साधूसंग तोलना ।
मुखाने राम नाम बोलना रे ! ॥धृ०॥
नरदेहाची संधि मिळाली ज्ञान दिले देवाने ।
नित्यानित्य-विवेकासाठी शुध्द रहा कर्माने ।
करा कथाकीर्तना वाढवोनी सद्गुणा साधुसंग तोलना ।
मुखाने राम नाम बोलना रे ! ॥१॥
दुर्व्यसनांना दूर करा रे ! सोडा गांजा दारु |
अपुल्या पोटासाठी कोणी नका जिवांना मारु ।
हाक त्यांचि ऐकना जना हेचि सांगना साधुसंग तोलना ।
मुखाने रामनाम बोलना रे ! ॥२॥
पाप करोनी द्रव्य कुणाचे चोरु नका हौशीने ।
करा कमाई कष्ट करोनी उन्नत व्हा कीर्तीने ।
स्वधर्मासि जागना कार्य करु लागना साधुसंग तोलना ।
मुखाने रामनाम बोलना रे ! ॥३॥
पर उपकारी रत व्हा सगळे आपत्तिस्तव धावा ।
याविण श्रेष्ठ मार्ग कुणि नाही देती संत पुरावा ।
ऐकना हो ऐकना ऐकुनिया घोकना साधुसंग तोलना
मुखाने रामनाम बोलना रे ! ॥४॥
हीच कामना ठेवुनि हृदयी साधुसंत निमाले ।
तुकड्यादास म्हणे ते तरले दुसऱ्या तारुनि गेले ।
ऐसी करा साधंना करोनिया प्रार्थना साधुसंग तोलना I
मुखाने रामनाम बोलना रे ! ॥५॥