अति लोभ फळे न कुणास कधी

(चाल : निघते पद एक घरी.. )
अति लोभ फळे न कुणास कधी विसरुच नका वचना असल्या ॥ धृ0॥
प्रभुने दिभली दुनिया सगळी झणि कष्ट करा सुखी व्हा म्हणूनि I
गरिबा अति दुःखचि का मग हे उपकार करा असल्या नसल्या ॥१॥
एकास गहु दुसन्यास तुरी तिसऱ्यास जवारीही न घरी ।
हा न्याय नसे प्रभुच्या घरचा प्रभु पाहतसे रुसल्या  रूसल्या ॥२॥
सगळे सुखी व्हा सुख मार्गचि हा एकास मिळे हे दुःख महा ।
मग कोणी असो नृप-रंक कधी जाईल कळेना तो  फसल्या ॥३॥
चिरकाल सुखे टिकतील सदा सगळ्या मिळुनी सुखी व्हा सगळे |
तुकड्या म्हणे याद न ही विसरा घ्या पाठ असा बसल्या बसल्या ॥४॥