आवरा स्वार्थ गड्या ! अपुला

(चाल : सुजन हो ! परिसा रायकथा...)
आवरा स्वार्थ गड्या  ! अपुला ।
देश हा अवनतिला गेला ॥ धृ०॥
कवणास कुणाची दया नसे आज़ या पाहता लोकी ।
अपुल्यात गर्क अति विषय-भाव मनि घोकी ॥१॥
कुणी मरो तरो कुणी करो काहि आचरो कुणाला चिंता ?
ही झाली गति देशाची या क्षणि आता ॥२॥
मरतात अन्न ना मिळे म्हणुनिया कुळे जाति परधर्मी ।
श्रीमंत सुखाच्या जरा न सोडी     ऊर्मी ॥३॥
म्हणतात पुढे व्हा कुणी फसू अम्हि झणी कोण सांभाळी ?
ही दिसतचि नाही उरा लागली काळी ॥४॥
या उठा नका करु हटा चला रे दटा कार्य करण्यासी ।
ना तरी तोंड हे नाही तुम्हा जगण्यासी ॥५॥
ना तरि मरु सर्वही तरु सर्वही धरु या प्रेमा ।
तुकड्याची ऐकुनि हाक पुढे या कामा ॥६॥