आवडला का प्रभू तुम्हाला ? सांगाना बंधुनो !

(चाल : रक्ष रक्ष ईश्यरा भारता .. )
आवडला का प्रभू तुम्हाला ? सांगाना बंधुनो !
का मग त्यांचे प्रेम न वाटे बोला   सुखसिंधुनो ! ॥धृ0॥
देवावर जरि प्रेम असे तरि घरदाराचे पिसे ।
असते ऐसे कसे मनातुनि ? लोभ मोह  का   दिसे ॥१॥
हा माझा हा परका गमतो यातचि वय जातसे ।
इंद्रिय - आसक्तीच्या योगे    चंचल    मन  खातसे ॥२॥
कधिकाळी सतचर्चा होता जरा वेळ हा कसा ।
जातो ना जातो तो    शिरली   द्वैताची    अवदशा ॥३॥
अपुले वर्णन करण्यासाठी देव देव बोलता ।
स्वार्थाने अति धुंद होऊनी का मग काळा भिता ? ॥४॥
काय करिल ते हरि करिल हे तोवरची साजिरे ।
तुकडयादास म्हणे अंगाशी दुःख   न   आले    पुरे ॥५॥