अवघड प्रभुची वाट गड्या रे ।

( चालः छम छम बाजे पायलियाँ . . ) 
अवघड प्रभुची वाट गड्या रे । 
विरळा चढतो घाट गड्या रे ! ॥धृ०।। 
कोणी यज्ञ करी , तंत्र - मंत्र जपी । 
कोणी पारायणे , साधताती तपी । । 
तरी सोडेना काम , आवरेना हे भान , 
हे    फोडती   बंध    कपाट   गड्या   रे ! ॥१॥ 
भक्ति - भावाने किर्तने - भजने करु । 
संत - संगि बसू , उपदेश स्मरु । । 
वेळ मिळता जरा , करि स्वारी पुरा । 
या मनाची बिकट ही   लाट   गड्या   रे ! ॥२॥
योग म्हणती करा , तोहि केला बरा । 
खेचरी , भूचरी , लावली मूदरा । । 
परि नाही गति , स्थीर नाही मती , 
साधकाचा असा   हा   थाट   गड्या   रे ! ll३ll
होय गुरुची कृपा , मार्गसाधेल पा । 
सहज साधे हरी , भेट देईल पा । । 
गुरु - बोधे मिळे , सर्व काही कळे , 
ऐसा तुकड्याचा अनुभव , दाट गड्या रे ! ॥४॥ 
- चिमूर , दि . ०३ - ११ - १९६१