चट् चट् उचला पाय गड्या रे !

( चालः छम छम बाजे पायलिया . . . ) 
चट् चट् उचला पाय गड्या रे ! 
वेळ नसे मग ती मागुता रे ।। धृ ।। 
वासना बावरी , विषय हे सोडिना । 
आयु सगळी दिली , पूर्णता मानिना । । 
भोग भोगा किती , तृप्त नाही मती , 
त्यास त्यागाविणा , न उपाय अता रे ।। १ ।। 
बाळपण खोविले , तरुणपणहि तसे । 
बघता - बघता अता वृध्दपण येतसे । 
गति नाही बरी , अंत होता तरी , 
हा खेळ फुका , मग   जाई   अता रे ।। २ ।। 
अंध होऊ नका , स्वार्थ साधावया । 
त्या यमाचे घरी , थोडि नाही दया । । 
कर्म तो पाहतो , शिक्षा ठोठावतो , 
दास तुकड्या म्हणे हे काय अता रे ? ॥ ३ ॥ 
                            - वरोरा , दि . ०३ - ११ - १९६१