किति बघशि अंत आमुचा ? श्रीहरी !
(चालः यमुना जळि खेळू खेळ...)
किति बघशि अंत आमुचा ? श्रीहरी ! ये धावुनी ।
सुख नाहि जगी तुजविना, भाव हा घे पाहुनी ।।धृ०।।
(अंतरा) जग नाशिवंत हे चळले ।
मेंढरावाणि खळबळले ।
हे जया ज्ञानिया कळले ।
नच राहि जरा तुरजविना, दया मनि घे निरखुनी ॥१॥
(अंतरा) हे विषय विषासम भासे ।
लागलो तुझ्या अम्हि कासे ।
नच त्रास कुणाचा सोसे ।
था अशा लेकरा करी, सख्या ये घे उचलुनी ।।२।।
(अंतरा) कोवळे मनाचे आम्ही ।
संस्कारजन्य अति कामी ।
लागलो अता तव नामी ।
तुकड्यादासा भेट दे हरी ! चित्त झुरते गाउनी ॥३॥