हरिभजनाची नुरली जागा, स्वतंत्रतेच्या परी
(चालः धन्य धन्य गे ! स्फूर्ति तन्मये...)
हरिभजनाची नुरली जागा, स्वतंत्रतेच्या परी ।
उलटली परवशता ही पुरी ।।
गुलामगिरिच्या कर्कश बेड्या, पडल्या पायी करी ।
धडकले परधर्मांचे अरी ॥
तन-मन-धन हे नेति हरुनिया, हसवुनि अस्वलिपरी ।
लावती आग घरीचे घरी ।
(अंतरा)
हिंदु चा नाश व्हावया चिंतिती मनी ।
अति दुर्बल केला देश चहुबाजुनी ।
वाटतो धाक हा गिळतिल कोण्या क्षणी ।
रक्षणकर्ता कोणिच नुरला, या पुढती कुणितरी ।
सखा हा भारत चिंता करी ।।१॥
गजांत-लक्ष्मी डुलली जेथे सौभाग्याच्या गुणे !
न होते काहि कुणाला उणे ।
सौख्य नांदले अखंड जेथे, रामराज्य दणदणे ।
खेळले सैनिक निर्भयपणे ॥
तपोबलाच्या आत्मिय ऊर्मी, भक्त-उरी सणसणे ।
भोगिले वैभव भारत-भू ने ।
(अंतरा) उतरला राहु अणि केतू हा अवकली ।
अन्नान्नदशा ही भारतभू पावली ।
ही परवशतेच्या भरी दुःखि जाहली ।
असा हिंदुनो ! वीर तुम्ही, कुणि गर्जा या अवसरी ।
सखा हा भारत चिंता करी ।।२।।
काय वाचता पुराण पोथ्या, राम-रावणी कथा।
त्यातुनी काय काय ऐकता ? ।।
गेला रावण निघुनी आता, सोय काय चिंतिता ? ।
दूसरा झाला हा मागुता ।।
सुर-असुरांचा झगडा नेहमी, चालतसे भोवता ।
रहावे सावध अपुल्या हिता ।
सांगतो राम हा उपासकांच्या प्रती ।
व्हा उभे धर्मरक्षणा, त्यजा दुर्मती ।
यश येइल तेव्हा हिंदूंच्या भोवती ।
करा करा तातडी मिळोनी, वेळ नसे ही बरी ।
सखा हा भारत चिंता करी ।।३॥
मारुतिच्या अंकिल्या मुलांनो ! आर्याच्या बंधुनो ! ।
सिंधुच्या मर्यादित बिंदुनो।।
कंसारीच्या गोपाळांनो ! नंद-नंद-कंदुनो ! ।
लाडक्या देवांच्या हिंदुनो ! ।।
शूर वीर श्रीछत्रपती शिवरायाच्या बिंदुनो ! ।
उभे व्हा तरुणांनो ! बंधुनो !!
हा धर्म-ध्वज घ्या करी,जपा मिळुनिया ।
कमवाच आपुला हक्क हक्क म्हणुनिया ।
आळवा अंतरी देवदेवतासि या ।
तुकड्यादास म्हणे तोडा ही, गळफासाची सुरी ।
सखा हा भारत चिंता करी ।।४।।