राष्ट्र-सुखाची कळकळ निर्मळ वाहतांना अंतरी

(चालः धन्य धन्य गे स्फूर्ति तन्मये..)
राष्ट्र-सुखाची कळकळ निर्मळ वाहतांना अंतरी ।
नसू दे स्वार्थ सख्या ! तिळभरी ।।धृ०।।
पर-सुखदुःखे मान आपुली, निष्कामी होउनी ।
कार्य कर न्याय- नीति सेवुनी ।।
सद्धर्माच्या त्त्व-तंतुला, तोडू नको धावुनी ।
रुढीला नाचू नको घेउनी ॥
राष्ट्रीय बंधु - भावना रमू दे   जगी ।
वाढवी प्रेम आपुल्या-पराच्या मधी ।
जातिचे कडक निर्बंध ढिले कर अधी ।
स्वैरपणे रंगू दे वीर स्वातंत्र्य धराया करी l
लावि ही ध्वजा दिगंतावरी  ॥१।।
तत्त्व शोधल्याविणा कुणाची करु नको खंडणा ।
अधिकसा मांडू नको फड दुणा ।।
निसर्ग-जग हा बाग प्रभूचा, रमवी मनि भावना ।
दुःखवू नको कुणाच्या मना ।।
फुले फळे ही सुंदर निरघतिल, कोण जाणतो खुणा ?
सुगंधे रुंजू दे मन्मना ।।
वाहु दे लाट ही   जोराची   आतुनी ।
कुणि उठा उठा हो ! या पुढती धावूनी ।
करु राष्ट्र -धर्म - हा जागा अपुल्यातुनी ।
ऐक्यपणाचे बाहु उभारुनि करु गर्जना बरी ।
होउ दे तरुण - वृत्ति बावरी  ॥२॥
वेळ-अवेळहि पाहुनि वर्तन ठेवावे आपुले ।
कर्म आचरोनि समयी भले ॥
देश सुखी व्हावया पाहिजे कार्य-क्रम चांगले ।
पाहिजे सदा मनी शोधिले ।।
पूर्वज अमुचे कार्यप्रसंगी कसे कसे वर्तले ।
चलावे थोरांच्या पाउले ।।
ही याद असू दे, विसरु नको चालता ।
जरि काळ आडवा आला कर पालथा ।
सोड ही अता तरि भोळिव निर्जीवता ।
तुकड्यादास म्हणे घे कानी, तोड उरीची सुरी ।
पडू  दे   प्राण    प्रसंगावरी ॥३॥