श्रीकृष्णाच्या मुखोग्दताचा आठव होता मना
(चालः धन्य धन्य गे स्फूर्ति तन्मये...)
श्रीकृष्णाच्या मुखोग्दताचा आठव होता मना ।
उसळती वीर - बोध - भावना ॥धृ०॥
सळसळता ते लाट वृत्तिची गीता-वाणीतुनी ।
निघाला ज्ञानांकुर गर्जुनी ।।
रणांगणावरि कठिण प्रसंगी, बोध करी वेधुनी ।
उभा हो पार्थ सख्या ! म्हणउनी ।।
हो जागा कर्तव्याला, घे गांडिवा ।
उजळवी जगी या विजयश्रीचा दिवा ।
दाखवी जगाला नीतिमार्ग हा नवा ।
धर्म - रक्षणा करावयासी तूच सख्या ! शाहणा ।
भिउ नको लढण्या समरांगणा ।।१।।
अन्यायालासहन करुनी जगणे नाही बरे ।
मरावे धर्म रक्षुनी खरे ।।
पूर्वजांचिया कुळा पहा हा, कलंक नाही बरा ।
करावा नाश लढोनी पुरा ।।
क्षत्रिय-धर्मा शोभे जैसी रीत धरावी उरा ।
फिरु नये रणांगणाहुनि घरा ।
विश्वासुनि सांगे कृष्ण आपुल्यापरी ।
ठसविता शब्द हे विजय होय भूवरी ।
या करा तातडी वेळ नसे ही बरी ।
उभा ठाकला वीर कुरुक्षेत्रात, करी गर्जना ।
वाजती रण - वाद्ये दणदणा ।।२।।
भारतभूच्या तरूणासाठी बोध देउनी सुखे ।
जाहले जय घेउनि पारखे ।।
सांभाळाया इतिहासासी नित्य जपा सारिखे ।
विरु नका होउनि हृदयी फिके ।।
कर्तव्याची ज्योत जागती सदा असू द्या मनी ।
बोध घ्या गीताजयंतीतुनी ।।
धन्य तो दिवस जै कृष्ण बोधि अर्जुना ।
थरथरा कापती शत्रूंच्या भावना ।
पुण्यात्मे करिती पुष्पवृष्टि त्या क्षणा ।
तोचि दिवस आजिचा गडे हो ! स्मरण व्हावया जना ।
धरा हृदयाशि नंद नंदना ।।३।।
शरिरे कितिदा तरी गळाली, बोध गळेना कधी ।
नाहि त्या नाशक कुणि औषधी ।
धन वडिलांचे सांभाळाया अधिकारा घ्या अधी ।
बोध द्या तरुणा हृदयामधी ।।
उठा उठा रे गोपाळांनो ! करा संघ आपुला ।
प्रार्थुया परमेशा - पाउला ।।
हा सोडुनि पळता बोध व्हाल पातकी ।
पूर्वजा दुःख बहु, पाहुनिया घातकी ।
अनुभवा आणता सर्वचि होती सुखी ।
तुकडयादास म्हणे जागे व्हा, विसरु नका हो खुणा ।
रंगवा रणांगणी जीवना ॥४॥