कितीतरि सांगु तुला सागु तुला यदुराया ?

(चाल : दुडू दुडू धावत ये..)
कितीतरि सांगु तुला सागु तुला यदुराया ?
हा   जिव    पाया घे   अपुलीया ॥धृ०॥
खंडुनि संसारा मजसी ने माघारा ।
वाचवि यमनगरा देऊनिया आधारा ॥
सहवत नाहि मला ये रे ये ये सखया !!
आवरि      माया    जाईन   वाया ॥१॥
जग हे लोभाचे नाही कुणी कोणाचे ।
होतिल का अमुचे ? अजवरी झाले कुणाचें ?
तुकडया प्रार्थि खुला ने रे ने सावळीया !!
जीव जवळिया खुलवुनि कळिया ॥२॥