येशिल का मोहना रे !

(चाल : वनवासी राम माझा..)
येशिल का मोहना रे  ! पाहण्या आपुली लिला ? ॥धृ0॥
सृष्टि कशी सुंदर केली रंगि रंगवुनिया भरली ।
वृत्ति तुला कैसी स्फुरली ? खेळ खेळला ॥१॥
भिन्न भिन्न जिव हे केले गुण-कर्म यांनी भरले ।
आपुले - दुजे ना   उरले    तुचि   जाहला ॥२॥
करिल जसा भोगिल तैसा न्याय नियतीचा तव ऐसा ।
नेम तोचि दासी - दासा  अजुन   चालला ॥३॥
सर्व तुझे केले दिसते तूचि भासशी ना येथे I
हेच उलट कैसे नाते ?   सांग   ना   मला ॥४॥
रंगी रंग ये दासाच्या पुरवि भावना विरहाच्या ।
उभा हो अता तुकड्याच्या नेत्रि निर्मला ! ॥५॥