चला गडे हो । चला पंढरी, भाव धरूनिया मनी ।

चला गडे हो । चला पंढरी, भाव धरूनिया मनी ।
विठोबा भेट देड़ धावुनी ॥ध्रु॥
पुंडलिकाने करुनि कमाई, देव आणिला जगी।
पहाया चला घेउनी सगी ।।
संसाराच्या सरोवरी ते, सौख्य न मिळते कुणा ।
विचारा विचार करुनी मना ।।
(अंतरा) मनपणा सोडुनी होउनिया मोकळे ।
देहभाव संगळा ओसंडावा बळे ।
मग रुप पहावे विटेवरी सावळे ।
आनंदाची नुरते सीमा, पहा पहा पर्वणी ।
निघा हो निघा  अहंतेतुनी ।।१॥
वाटे भू-वेकुंठ उतरले, चंद्रभागेच्या तिरी ।
न दुसरे स्थान असे भूवरी ।।
सुकृत ज्यांचे उदया येई, ते जन वारी करी ।
विसरती भव - भय दुरच्या दुरी ।।
चहु मार्गांनी विठ्ठल विठ्ठल ध्वनी उठे अंबरी ।
दाटतो   प्रेमभाव   अंतरी ।।
कडिकोट किले मजबूत बांधल्या गढ्या ।
निर्भये भक्तजन मार्गि घालती उड्या ।
नाचती लोळती घेउनिया सौंगङ्या ।
काळ जाइना फुका, लाजतो यम पाहनि दूरुनी ।
भक्ति जे करिती हृदयातुनी ।।२॥
आषाढी-कार्तिकीस येती, अफाट जन भक्तिने ।
रंगती हरुनि भेद उन्मने ।।
दिडि-पताका, मृदंग-वीणे, असंख्यसे वाजती ।
कुंठते कर्णि ऐकता मती ।।
धो धो कणे, टाळ-झांजरी, आणिक वाद्ये किती ।
गर्जती भक्त मुखे अगणिती ।।
पुंडलीक वरदा हरी विठ्ठल  ऐकता ।
ती अफाट सेना डोळ्याने पाहता ।
पालख्या पादुका क्षणही सहवासिता ।
देहभाव हरतसे, काय मी सांगु पुढे काहणी ?
पहा रे ! पहा एकदा कुणी ।।३।।
करुनि कृपा श्रीज्ञानदेव बोलले ग्रंथिच्या खुणा ।
जयांनी तुटति जीव - यातना ।।
सुलभ व्हावया मार्ग, तुकोबा अभंग वदती जना ।
अभंगी लागे मन चिंतना ॥
एकनाथ एक नाथ आमुचा उदार होउनि मना ।
प्रगटवी गुप्त - गुह्य भावना ।।
वसविली अशी ही पावन - भू भूवरी ।
सुख संतांचे माहेर खरी पंढरी ।
मी बघता झालो देहिच वेड्यापरी ।
तुकड्यादास म्हणे नरदेही घ्या सार्थक करवुनी ।
वेळ ही दवडु नका हो कुणी ॥४।l