रामतीर्थ अति रम्य ठिकाणी, गेलो मिळुनिया
(चाल: पतीतपावन नाम ऐकुनी...)
रामतीर्थ अति रम्य ठिकाणी, गेलो मिळुनिया ।
रामेश्वर लिंगाचे दर्शन, झाले नेत्रा या ।।धृ०।।
अति पुरातन भव्य स्थान हे, हेमाडी बांधी ।
नखशिखांत कोरुनी बसविला, सामोरी नंदी । ॥१॥
सुंदर मनकर्णिका जलाने, भरली अति गोड ।
गमे जणू ही काशिच दुसरी, कोरियला पहाड ।।२।।
रूप मनोहर सांळुकेवरि, रामेश्वर लिंग ।
वेद - गर्जना, धार जलाची, चालतसे चांग ॥३॥
सदा सोवळा हा शिव भोळा, अलंकार यासी ।
काशीमध्ये भस्म लावतो, उलट रीत इथची ॥४॥
उष्ण जले अभ्यंग स्नाने, बघली मी त्याची ।
अति श्रृंगार चढे अंगावर, शोभा बहु साची ॥५॥
घननन घननन वाजति घंटे, ग्जतसे भेरी ।
द्वारि चौघडा वाजंत्रेही, वाजे अति प्यारी ।।६॥
तल्लिन मन झाले बघताना, कृतार्थ जिव झाला ।
तुकड्यादास म्हणे दर्शनि हा, तारी सकलाला ।।७।।