चलाना ग अपुलिया अंतरंगा भेटावया जिवलगा पांडुरंगा

( चाल : गौळणी सांगती गाऱ्हाणी .. )
चलाना ग अपुलिया अंतरंगा भेटावया जिवलगा पांडुरंगा I
सोडूनिया बाहेरचिया रंगा नाचू खेळू हरिच्या आत्मरंगा ॥धृ॥
निर्मळ हदयी या बसवाया भक्तिचे सिंहासनी न्याया I
चिन्मय ज्योति ओवाळू तया ॥१॥
कटावरि ठेवुनिया हात उभा करु आपुल्या हृदयात ।
पितांबर झळके लखलखीत फाकतसे तेज या नभा आत ॥२॥
गळ्यामधी माळा ती वैजयंती मुयराचे पंख मुकुटावरती ।
पाहतांना हरपे मन-वृत्ती ॥३॥
चला चला सोडूनी विषयाला पाहू सखा सावळा
बंसिवाला ।
विसरुनी जाऊ या शरीराला तुकड्याचा भावचि देव झाला ॥४॥