हे ईश्वरा ! जिवाला स्वातंत्र्यता असु दे

(चाल : ईश्वरको जान बन्दे... )
हे ईश्वरा ! जिवाला स्वातंत्र्यता असु दे ॥धृo॥
आचारशील जे जे जगि राहतात कोणी ।
त्यांच्या सदा स्वभावा स्वातंत्र्यता असू दे ॥१॥
छळती न जीव कोणी जाणोनि ऐक्यभावा ।
त्यांच्या सदा स्वभावा स्वातंत्र्यता असू दे ॥२॥
सर्वाभूति प्रभु हा नांदत असे सदाची I
मग बंध का कुणाला ? स्वातंत्र्यता असू दे ॥३॥
खावोत आपुलाले श्रमवोनि देह न्यायी ।
त्यांना नसो मनाई  स्वातंत्र्यता    असू   दे ॥४॥
तुकड्या म्हणे निसर्गासम शांत ठेव जनता ।
बहु त्रासलेत आता  स्वातंत्र्यता   असू   दे ॥५॥