श्रीसदगुरुनाथ पदी

(चाल: विठ्ठल रखुमाई परी ...)
श्रीसदगुरुनाथ    पदी ।
अखंड राहो नत मस्तक हे हीच मनी भावना ।
पुरवशील का रे मन - कामना ? ॥धृ0॥
संसाराचे सौख्य समजुनी फसला जीव माझा ।
मोहजाळी या विटलो सगळा चुकला अंदाजा ॥
मार्ग दाखवी तुझ्याच घरचा करितो मी याचना ।
पुरवशील का रे ! ! ॥१॥
भक्त - काम कल्पद्रुम असशी तू गंगेवाणी ।
म्हणूनी भावना सरसरली ही ऐकुनिया कानी ॥
त्वरित पुरवितो लळा गुरु हा तोडण्यास बंधना ।
पुरवशील का रे ! ॥२॥
आवडिचा तू प्रभू ! म्हणोनी मन वेडे झाले I
अर्पण केले जिवभावे तुज चित्ति असे धरले ॥
तुकडयादासा सुमति देऊनी चुकवी यम - यातना I
पुरवशील का रे ! ॥३॥
                             - गुरूकुंज दि .०१-११-१९५५