सामाजिक जीवनाचा कोणी मुरदा पांडला

( चाल : वहिनीने माझ्या भावाचं ... )
सामाजिक जीवनाचा कोणी मुरदा पांडला ।
जैसा सेवकाचा कोणीतरी प्राण काढला ! ॥धृ 0॥
भुतमात्राशी समरस व्हावे ।
अपुले म्हणूनी सुखवित जावे ।
मानप्रतिष्ठे तिळ न पहावे ।
एकाकी हा भाव सोडला ॥ सामा 0 ॥१॥
कष्टाविण नच भोजन तिळही ।
सद्हेतुने करि खळबळ ही I
नच सत्तेची कधी तळमळही ।
भक्तिने जीव हा वाढला ॥ सामा 0 ॥२॥
काय हवा ही ऐसी बदलली I
सदभावाची वृत्तिच नुरली ।
लोभाने सत्ता उरि धरली I
क्रोधाने विवेक गाडला ॥ सामा 0 ॥३॥
जोवरि सत्संगति मुळी नाही I
तोवरि जगणे नाहि कुणाही I
तुकड्यादास देतसे ग्वाही ।
सार असा हा ताडला ॥ सामा 0 ॥४॥
- अहमदाबाद दि .०१-११-१९५७