सुख पाहोनि दुसऱ्याचे झुरता का
( चाल : कमरेला कमरपट्टा ... )
सुख पाहोनि दुसऱ्याचे झुरता का न दुःखात सामील होता ? ॥ धृ0॥
आम्ही फुकट मजुरांचे खावे तरी त्यासि साहाय्य न व्हावे I
यासाठीच पाहिजे का सत्ता ? ॥ का न 0 ॥१॥
कोणी दारी आला उपवासी झिडकारोनि द्यावे का त्यासी ?
सांगा काय सांगे धर्म गीता ? ॥ का न 0 ॥२॥
मुले-बाळे तुमची शिकलेली शेजाऱ्यासी सही नाही आली ।
हा दोष कुणाच्या हो माथा ? ॥ का न 0 ॥३॥
आम्ही म्हणतो सारे भाऊ भाऊ मग सर्व वाटून का न घेऊ ?
हे समजायला पाहिजेच आता ॥ का न 0 ॥४॥
घेऊ नका गडे हो ! शंका हा वाज़ला जगामध्ये डंका ।
ऐका खुले बोल हे आता ॥ का न 0 ॥५॥
ते विसरा झाले जे मागे नांदू सर्व सुखाने संगे ।
दास तुकड्या म्हणे घ्या ही संथा ॥ का न 0॥६॥
- नागपूर, दि. २७-०३-१९५७