झणझण करिती कर्ण अजुनिया कुणी वाजविली तारी ?
(चालः विनविते तुम्हा रखुमाबाई...)
झणझण करिती कर्ण अजुनिया कुणी वाजविली तारी ? ॥धृ0॥
नेत्र मिटवुनी एकांती मी ।
बसलो सहज समाधी स्थिती मी ।
झकझक पडला प्रकाश हृदयी
सुधबुध हरली सारी ॥१॥
मधुर मधुर चिपळीची टाळी ।
रुणझुण घागरियांची कहाळी ।
डोलू लागले हदय उल्हासे
ऐकूनिया ललकारी ॥२॥
सोहं सोहं शब्द उमटले I
गगना भेटुनि गुंजारवले I
तुकड्यादास म्हणे गुरूदेवा !
बालिहारी ! बालिहारी !! ॥३॥
- नागपूर दि . १७ -०८-१९५८