वैरीणी ! माझ्या देवाचं ध्यान का मोडलं ?
(चालः वहिनीनं माझ्या भावाचं...)
वैरीणी ! माझ्या देवाचं ध्यान का मोडलं ?
गुरुदेवाच्या दयेनं होत प्रेम जडलं ॥धृ0॥
होतो आसनावर बसुनी सुखाचा ।
तोल सावरुनी अपुल्या मनाचा ।
पाहता पाहता निजभाव या जिवाचा
देहासी धरुनीया पाडलं ॥१॥
कुठे गेलं ध्यान आणि प्रार्थनेचं मंदिर ।
कुठे गेली पूजा आणि आसन ते सुंदर ।
भयानक कामक्रोध धावले अंगावर
स्वप्नाचं डोंगर चढलं ॥२॥
भान नाही उरलं जरा तोल धराया ।
आता कशी सावरु सांग तुझी ही माया ?
कोणा शरण जाऊ ? सांग तुकड्या या
भक्तीचं वेड कसं वाढलं ? ॥३॥
- अहमदाबाद दि.0१-११-१९५७