अनुभव - योगी सदगुरु माझा, एकांती बोले

(चालः पतितपावन नाम ऐकुनी...)
अनुभव - योगी सदगुरु माझा, एकांती बोले ।
स्वप्नसुखाला पाहुनि का रे ! ब्रिद खोविशि अपुले ।।धृ०।।
शोधि गड्यारे ! सत्य वस्तुला, हो सावध आता ।
मायाबी हे त्रिगुण जाणुनि, नच जा  या   पंथा ।।१।।
चिन्मयरुपा पाहि स्वरुपा, का भुलला बापा !
सहजासनि बैसुनी   सोडवी,  चौर्यांशी    खेपा ।।२।।
चवथा देह शोधुनी पाही, नवलाचे नवल ।
अधो-ऊर्ध्व त्या शून्य - महाशून्यात  असे   बाळ।।३।।
सोहं मंत्रा घे पटवोनि, सत्संगति साधी ।
तत्स्वरूपाचा ध्यास लागता, मग कैची व्याधी ? l।४।।
नाद - बिंदु साधुनी,ध्वनीला अंतर्गत ठेवी ।
ध्यानी ध्याता साक्षी   होशी, मग    अमृत   सेवी ॥५॥
मन बुद्धिचा होऊनि साक्षी, पाहता निजसंधी ।
जागृति स्वप्न सुषुप्तीमाजी,  निजरूप    आनंदी ॥६॥
नसे पाच मुद्रांची थोरी, अंत नसे रंगा ।
तुकड्यादास म्हणे    स्वानंदी,  पावे  भव   भंगा ॥७॥