रक्षि रक्षि सदगुरुमाय ! मज कोणि दुजा नाही

(चालः पतीत पावन नाम...)
रक्षि रक्षि सदगुरुमाय ! मज कोणि दुजा नाही ।
जाइल वाया तुजविण काया, फसलो भवडोही ।।धृ०॥
त्रैतापाचा अग्नि लागला, पडलो त्यामाजी।
काम- क्रोध -मद- मत्सर वैरी, खाती मज आजी ।।१॥
स्पर्श- रुप- गंधादिक जमले, शरिरी भय भारी ।
त्या माजी मन  चंचल   झाले, बुडवी    भवधारी ।।२॥
आयुष्याची दोरि, यमाजी-उंदिर तोड करी ।
झुरणी पडले  वय   हे   सारे, ये   सखये !  तारी ।।३॥
ऐशा या पाशातुनि सुटका, कशि होइल माते ! ।
तुकड्यादासा    मुक्त   करी,   ने   पदपंकजपंथे ॥४।।