श्रीहरी ! कोठवरि अता फिरविसी वाया ?

(चालः श्रीधरा ! बोल हे काय पाप..)
श्रीहरी  ! कोठवरि अता फिरविसी वाया ?
जाहलो श्रमी बहु नका   दावु   ती   माया ॥ श्रीहरी ! ॥धृ0॥
राहुनी प्रपंची जिवा नसे सुख काही I
करिताचि कष्ट बहु शिणलो या भव-डोही ॥ श्रीहरी ! ॥
पाहुनी द्रव्य - सुत - दार वैभवा ऐशा ।
भटकला जीव हा न सुटे घरची आशा ॥ श्रीहरी ! ॥
मागता भीक श्वानासम पोटासाठी I
हे हीन कर्म मारिते आडवी काठी ॥ श्रीहरी ! ॥
( अंतरा ) नच द्रव्य कधी घेउनी पाहिले डोळा ।
कष्टला जीव मम सर्व सोशिता ज्वाळा ।
घरधनी कशाचा घरचा बाइल - साळा ।
हा नर-जन्मांचा काळ लोटला  वाया ॥ जाहलो श्रमी 0 ॥१॥
कुणि बरे पाहिना जावे दुसऱ्या दारा ।
काय सांगु वैभव ऐशा या परिवारा ? ॥ श्रीहरी ! ॥
तरि तुझे नाव मम न ये मुखी भगवंता ! ।
श्रीगुरु - कृपेने आठवला गुणवंता ! ॥ श्रीहरी ! ॥
आठवता ऐसे वाटे मज ते काळी I
फेडील पांग हा येउनिया वनमाळी ॥ श्रीहरी ! ॥
(अंतरा) ते मधुर बोल ऐकवशिल श्रवणी कधी ।
येउ दे दया मम शांतवि अपुल्या मधी ।
ऐश्वर्य जाउ दे मज घे आपुल्या पदी ।
तुकड्यास ठाव दे श्रीसद्गुरुच्या पाया । जाहलो श्रमी 0 ॥२॥