सतसंगि चित्त लावी विसरू नको नरा रे !

(चालः आनंद कंद ऐसा...)
सतसंगि चित्त लावी विसरू नको नरा रे ! ।
व्यसनास त्यागुनीया सतसंग साध जा रे ! ॥धृ0॥
कोणी न येति साथी जग सर्व हे फुकाचे ।
गुरु-संत मार्ग दावी    घे   बोध   निर्मळा   रे ! ॥१॥
सुत-दार चालतीचे पडतीस येति मागे ।
कवडी न देति कोणी मग  रामची   सखा  रे ! ॥२॥
हा देह नष्ट वेड्या ! टाकोनि जाय जीवा ।
मग सांग काय नेशी ? आपुल्यासवे गड्या रे ! ॥३॥
तुकडया म्हणे समज हे गुरूच्या कृपा प्रसादे ।
हो साक्षि या जगाचा तरि मुक्त  होशि   बा  रे ! ॥४॥